पुणे : झुव्हियस लाइफसायन्सेसच्या ‘पिंक स्ट्रीट अभियानाच्या दुसऱ्या आवृत्तीत, तीन फेब्रुवारी रोजी कराडमधील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेसमध्ये झालेल्या कार्यक्रमात कर्करोगासंबधी जागरूकतेचा संदेश देणाऱ्याहाताने मुद्रण केलेल्या देशातील सर्वाधिक लांबीच्या ‘पिंक रिबीनी’ चे अनावरण करण्यात आले.
कर्करोग जागरुकता मोहिमेला आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि ही रिबीन सुशोभित करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येथे जमले होते.
कर्करोग, त्याची कारणे, लक्षणेआणि प्रतिबंधाबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने झुवियस लाइफसायन्सेसने ‘पिंक स्ट्रीट’ मोहिमेची सुरुवात केली आहे.ज्या कर्करोगग्रस्तांनी प्रतिकूल परिस्थितीतही या रोगाशी सामना करून त्यावर मात केली आहे आणि जे आनंदाने जीवन जगत आहेत, अशा धाडसी रुग्णांना ही मोहीम सलाम करते.
‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ ने २०२० पर्यंत तब्बल १७.३ लाख नवीन कर्करोग रुग्ण निर्माण होतील आणि ८.८ लाख मृत्यू कर्करोगाने होतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे जनतेला या घातक रोगाबद्दल जागरूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन झुवीयस लाईफसायन्सेसने या रोगाच्या गांभीर्याकडे लक्ष वेधण्याकरता या विक्रमी उपक्रमाला सुरुवात केली आहे. ‘पिंक स्ट्रीट’ मोहीमेला २०१६ मध्ये प्रथम पुण्यात सुरुवात झाली,तिला अतिशय उत्तम प्रतिसादही मिळाला.
कराडमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना झुव्हियस लाईफसायन्सेसच्या विपणन विभागाच्या संचालिका अलका चव्हाण म्हणाल्या, “संपूर्ण देशाला या महाभयानक रोगाच्या धोक्याची जाणीव व्हावी आणि तातडीने त्याची घेऊन प्रतिबंधासाठी काम करावं, या उद्देशाने आम्ही या मोहिमेचा प्रारंभ केला आणि तिची व्यापकता वाढावी यासाठी ४ फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनापर्यंत ती सुरू ठेवली.”
“पिंक स्ट्रीट मोहिमेव्दारे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि त्यांना कर्करोग, त्याची लक्षणे, प्रतिबंधात्मक तसेच, उपाययोजनांविषयी माहिती देण्याची आशा करतो,” असे झुव्हियस लाईफसायन्सेसच्या अॅडमिन आणि ऑपरेशन्स विभागाचे संचालक शैलेश शेट्टी यांनी सांगितले. ते म्हणाले, “आम्ही कर्करोगाविरोधात प्रत्येक घरात, प्रत्येक गल्लीत, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हा लढा पोहचवू इच्छितो.”
मुंबईमध्ये मुख्यालय असलेली झुव्हियस लाइफसायन्सेसही एक संशोधनावर आधारीत अत्युकृष्ट उत्पादने निर्माण करणारी औषध निर्माण कंपनी आहे. लोकांना आराम देणारी अभिनव औषधे आणि उपचार देण्यासाठी वैविध्यपूर्ण उत्पादनांची श्रेणी उपलब्ध करण्यात कंपनीचे मोलाचे योगदान आहे.